एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवड मध्ये मराठी दिनानिमित्त मराठी स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन......
दिनांक २७ फेब्रुवारी मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्त एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल सासवड प्रशालेमध्ये "मी मराठी माझी स्वाक्षरी मराठी" या उपक्रमांतर्गत मराठी स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. प्रमुख पाहुण्यांसहित प्रशालेतील मुख्याध्यापक,शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी,पालक सर्वांनीच मराठीतून स्वाक्षरी करण्याचा आनंद लुटला. प्रमुख पाहुणे पक्षीमित्र अमित पावशे यांनी विद्यार्थ्यांसमोर ओळख पक्षांची हा विषय प्रभावीपणे मांडला. तर हरिश्चंद्र धुमाळ यांनी वृक्षारोपण व संवर्धन याविषयी माहिती सांगितली. मा. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर- नागनूर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर अश्विनी खळदकर व विद्यार्थिनी श्रेया मांढरे यांनी अनुक्रमे नाट्यवाचन व काव्यवाचन सादर केले. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रशालेने यावर्षी पर्यावरण संगोपन या उपक्रमांतर्गत सर्व विद्यार्थी शिक्षक यांच्याकडून जवळपास 170रोपे कुंड्यांमध्ये लावून घेतली व या दिवशी प्रत्येकाने एका कुंडीचे पालकत्व घेतले. मा.मुख्याध्यापिका यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी विभागातील भाऊसाहेब येळे व सोनिया कुलकर्णी यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन भाऊसाहेब यांनी केले.
शुक्रवार, दिनांक २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल मध्ये विज्ञान प्रदर्शन आणि चित्रकला व हस्तकला प्रदर्शन भरविण्यात आले होते. सदर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे व उद्घाटक म्हणून नाटक क्षेत्रातील जाणकार व्यक्तिमत्व प्रसाद वनारसे व मृणालिनी वनारसे तसेच स्वाती पटवर्धन इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रमुख पाहुणे प्रसाद वनारसे यांनी कवितेतून विज्ञान विद्यार्थ्यांसमोर साकारले तर मृणालिनी वनारसे यांनी स्वानुभवातून विज्ञानाचे महत्त्व पटवून दिले. स्वाती पटवर्धन यांनी विद्यार्थ्यांना विज्ञानातील गमती जमती सांगितल्या. तसेच प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर- नागनुर यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांनी प्रत्येक विषयात विज्ञानाचा शोध घ्यावा असे आवाहन केले. केजी ते इयत्ता आठवी पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनात सहभाग घेऊन वेगवेगळ्या विषयावर आधारित प्रात्यक्षिके, प्रयोग, खेळ, चित्रे, हस्तकलेतील वस्तू यांचे सादरीकरण केले. यासाठी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले होते. मा. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर-नागनुर यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञान विभागातील निकिता होले यांनी कार्यक्रमाचे आयोजन व सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला पालक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे योगदान लाभले.
८ मार्च जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम एम.ई.एस. इंग्लिश मीडियम स्कूल, सासवड प्रशालेमध्ये उत्साहात साजरा केला...
महिला दिनानिमित्त प्रशालेतील इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी बाल सभेचे आयोजन करून संपूर्ण कार्यक्रम नियोजनपूर्वक पार पडला.
सदर कार्यक्रमामध्ये प्रशालेतील मा.मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर, शिक्षकवृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने त्यांना डायरी व विद्यार्थ्यांनी बनवलेल्या ग्रीटिंग भेट देऊन गौरव करण्यात आला. तसेच विद्यार्थी, शिक्षक व सेविका यांनी कविता आणि मनोगत व्यक्त केले. प्रशालेच्या मा. मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर यांनी बालसभेच्या आयोजनाबद्दल विद्यार्थ्यांचे कौतुक केले व महिला दिनाचे महत्त्व विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. कार्यक्रमाचे आयोजन भाऊसाहेब येळे व वर्गशिक्षिका स्वाती पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांनी केले. सहावीच्या विद्यार्थ्यांनी शिक्षकांना देण्यासाठी ग्रीटिंग तयार केले. मल्हार बागडे व चैतन्य फडतरे या विद्यार्थ्यांनी सूत्रसंचालन केले तर आरोही पाटसकर या विद्यार्थिनीने आभार प्रदर्शन केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.