युवा चेतना दिनानिमित्त एम. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल व योगविद्या केंद्र सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने १०८ सूर्यनमस्कार व युवा चेतना दौडचे (मिनी मॅरेथॉन) आयोजन….
सोमवार, दि. १२ जानेवारी २०२६ राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंती निमित्त राष्ट्रीय युवा चेतना दिनाचे औचित्य साधून युवा चेतना दिन या उपक्रमांतर्गत एम. ई. एस. इंग्लिश मिडीयम स्कुल व योगविद्या केंद्र सासवड यांच्या संयुक्त विद्यमाने अखंड सूर्यनमस्कार यज्ञ व मिनी मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमास सासवड मध्ये आलेल्या जेंगो सर्कसमधील मार्शल आर्ट सादर करणारे कलाकार श्री.लॉरेन बंब संता व हसीना बानू हे प्रमुख अतिथी म्हणून लाभले होते. पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन तसेच ज्योत प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. उपस्थितांनी दाते पुरस्कृत संगीताच्या तालावर १०८ सूर्यनमस्कार घातले. प्रशालेतील विद्यार्थ्यांनी सांघिक प्रार्थना गीत सादर केले तसेच प्रशालेतील विद्यार्थ्यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्यावर सुंदरसे पोवाडे व भाषणे सादर केली. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात युवा चेतना दिनाच्या शुभेच्छा दिल्या तसेच योगविद्या केंद्राचे प्रमुख वैद्य. घनश्याम खांडेकर यांनी बलोपासनेचे महत्त्व विशद केले व सर्व विद्यार्थ्यांनी स्वामी विवेकानंद यांचे गुण अंगिकारावेत असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रशालेच्या माननीय मुख्याध्यापिका कल्पना खांडेकर – नागनूर व पर्यवेक्षिका सरोज जांगडा यांनी मार्गदर्शन केले.
त्यानंतर युवा चेतना दौडची सुरुवात पालखी मैदानाच्या प्रांगणातून झाली. ही दौड पालखी तळ – कोडीत नाका – अमर चौक – जयप्रकाश चौक – शिवतीर्थ चौक मार्गे पालखी मैदानापर्यंत होती.
स्पर्धकांनी दोन किलोमीटर अंतर पूर्ण केले. त्यामध्ये पहिली ते नववीचे सुमारे १०० विद्यार्थी, योगविद्या केंद्राचे २५ साधक, प्रशालेतील १५ शिक्षक व पालक सहभागी होते. या कार्यक्रमाचे आयोजन नीता जगताप व अंकिता जगताप यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.भाऊसाहेब येळे यांनी तर प्रास्ताविक निकिता होले यांनी केले. आभार सौ. रुचिरा गार्डी यांनी मानले. कार्यक्रमाची सांगता वंदे मातरम व पसायदानाने झाली. प्रसाद वाटपाने गोड शेवट झाला.

